दीपक ओढेकर, नाशिक
आज चीन मधील हॅंग्झाऊ येथे १९ व्या आशियाई स्पर्धेची ( भारतातीसाठी )सांगता झाली आणि त्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे प्रथमच नाशिकचे मृण्मयी साळगावकर (रोइंग), सिध्दार्थ परदेशी (डायव्हिंग), सर्वेश कुशारे (हाय जंप) आणि विदित गुजराथी (बुद्धिबळ) या खेळात भारताकडून खेळले पण अंतिम फेरीत पोहोचूनही त्यांना दुर्दैवाने पदकाने हुलकावणी दिली.
तरीही अशा थोड्या निराशाजनक सुरुवातीनंतर मात्र विदित गुजराथी कर्णधार असलेल्या भारतीय संघाने सांघिक गटात अंतिम फेरीत फिलिपिन्सचा ३/१ असा पराभव करुन नऊ देशात इराण पाठोपाठ दुसरे स्थान मिळवून रौप्य पदकाची कमाई केली.
त्यापूर्वी भारतीय पुरुष कबड्डी संघाने चीन ताइपेइ संघाला अतिशय चुरशीच्या लढतीत ३३/२९ असे अंतिम क्षणी आणि तेही तासभर वाद झाल्यानंतर हरविले आणि सुवर्णपदक पदरात पाडले. हा वाद झाला नसता तर सामना २७-२७ असा एक मिनिटाचा खेळ राहिला होता तेंव्हा थांबला आणि सामन्याचा निकाल भारताविरूध्दही गेला असता हे विसरून चालणार नाही. विजेत्या भारतीय संघाकडून नाशिकचा आकाश शिंदे हा चढाईपटू खेळला व त्याने चमक दाखविली.
नाशिकच्या पदरात कांस्यपदक पडले ते इराण महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन यांच्या रुपाने ! काल चीन ताइपेइ संघाविरूध्द झालेल्या उपान्त्य फेरीच्या लढतीत इराण संघ ३५-२४ असा ११ गुणांनी हरल्यामुळे त्यांना आणि भारताविरूध्द हरलेल्या नेपाळला विभागून कांस्यपदक पदक बहाल करण्यात आले.
अशा रितीने वैयक्तिक जरी नाही तरी भारताला मिळालेल्या तीन सांघिक पदकात नाशिकच्या खेळाडूचा वाटा आहे आणि ही पुढे होणाऱ्या अधिक चांगल्या कामगिरीची नांदीच आहे असे म्हणू या पुढील आशियाई, राष्ट्रकुल इ आंतरराष्ट्रीय स्पर्धात अधिक नाशिककर असतील आणि नाशिकला अधिक पदके मिळतील अशी आशा धरायचा निश्चित जागा आहे हेच या आशियाई स्पर्धेचे फलीत…..