पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच भाजप आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यास मारहण केल्याची घटना घडली. या कार्यक्रमास अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
ससून रुग्णालयाच्या कार्यक्रमात कांबळे यांचा संताप झाला. त्यानंतर या कार्यक्रमातच त्यांनी आपला राग राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण करुन काढला. त्यानतंर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली. राज्यात भाजप, शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र आहे. त्यामुळे सत्ताधारी असलेल्या पक्षातील दोघांमधील ही भांडण चव्हाट्यावर आले आहे. पुण्यामध्ये पालकमंत्री अजित पवार झाल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीत सुप्त भांडण सुरु आहे. त्यातच या घटनेने त्यावर शिक्कमोर्तब केला.
आमदार सुनील कांबळे यांनी सांगितले की, त्या माणसाने मला दोन ते तीन वेळा धक्का दिला. त्यामुळे माझा राग अनावर झाला. त्याल दोन तीन वेळा संगून झाल्यानंतर त्यांनी एेकलं नाही. म्हणून त्याला मी मारलं तर सातव यांनी सांगितले की, एवढ्या गर्दीमध्ये धक्का लागणे साहजिक असते परंतु मारणे हे योग्य आहे का? असा प्रश्न त्यांनी केला.