नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुकानात झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या भडक्यात गंभीर जखमी झालेल्या दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. इंदिरानरधील ही घटना सोमवारी घडली होती. येथील कलानगर सिग्नल जवळ मैत्री विहार अपार्टमेंटच्या गाळ्यात असलेल्या वक्रतुंड पार्सल पॉईंटमध्ये अचानक गॅसचा भडका झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले होते.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की. दुकानाचे चालक सुरेश नारायण लहामागे व संदीप सकाराम कालेकर हे सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. यावेळेस त्यांनी दुकानाचे शटर उघडले. त्यानंतर त्यांनी दुकानातील लाईट सुरु करण्यासाठी बटण दाबल्यानंतर अचानक भीषण भडका झाला. या भडक्यात दुकानातील स्टीलचे रॅक दहा फूट लांब उडाले. या स्फोटाचा आवाजामुळे परिसरातील नागरिक हादरून गेले होते.
दुकान बंद केल्यानंतर झालेल्या गॅस गळतीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. ही घटना झाल्यानंतर दोघां जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचार सुरु असतांना ४ जानेवारी रोजी या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.