मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -आयआयटी मुंबईमध्ये आयोजित प्लेसमेंट हंगाम २०२३-२४ च्या पहिल्या टप्प्याचा समारोप झाला. आयआयटी मुंबई मधील विद्यार्थ्यांची भर्ती करण्यासाठी ३८८ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी यात सहभाग घेतला होता. यामध्ये प्री-प्लेसमेंट ऑफर (पीपीओ) देणाऱ्या कंपन्यांसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा (पीएसयू) समावेश होता. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि क्रॉस ऑफर कमी करण्याच्या दृष्टीने विविध कंपन्यांचे नियोजन आयआयटी मुंबई करते. .कंपन्यांनी उमेदवारांशी वैयक्तिकरित्या किंवा आभासी मंचाद्वारे संवाद साधला सर्व विद्यार्थी संकुलातच मुलाखतीसाठी हजर होते.
२० डिसेंबर २०२३ पर्यंत १३४० नोकरीचे प्रस्ताव देण्यात आले ज्यामुळे ११८८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. यामध्ये पीएसयूमध्ये ७ जणांचा तसेच इंटर्नशिपद्वारे २९७ पीपीओचा समावेश असून यापैकी नोकरीचे २५८ प्रस्ताव स्वीकारण्यात आले आहेत.
या हंगामात एक्सेंचर,एअरबस, एअर इंडिया,ऍपल, आर्थर डी. लिटल,बजाज, बार्कलेज,कोहेसिटी, दा विंची, डीएचएल फुलेरटन,फ्युचर फर्स्ट, जीई- आयटीसी, ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरन ,गुगल, होंडा आर अँड डी , आयसीआयसीआय -लोम्बार्ड,आयडीया फोर्ज, आयएमसी ट्रेडिंग, इंटेल,जग्वार लँड रोव्हर,जेपी मॉर्गन चेस, जेएसडब्ल्यू ,कोटक सिक्युरिटीज,मार्श मॅक्लेनन, महिंद्रा ग्रुप, मायक्रोसॉफ्ट, मॉर्गन स्टॅनले, मर्सिडीज-बेंझ, एल अँड टी, एनके सिक्युरिटीज या अव्वल कंपन्या सहभागी झाल्या होत्या. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर, वित्त / बँकिंग / फिनटेक, व्यवस्थापन सल्लामसलत, डेटा विज्ञान आणि अॅनालिटिक्स, संशोधन आणि विकास आणि डिझाइन ही नोकरीचे सर्वाधिक प्रस्ताव देणारी क्षेत्रे आहेत.
जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील नोकऱ्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकऱ्यांचे ६३ प्रस्ताव होते. सीटीसीसह वार्षिक १ कोटी पेक्षा जास्त वेतन असलेल्या स्वीकृत नोकरीचे ८५ प्रस्ताव होते.