पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी लेटर बॉम्ब टाकत कुलगुरु आणि प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर बुधवारी नाशिकच्या विदयार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासन आज नरमले असून त्यांनी तीन मुख्य मागण्या मान्य केल्या आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि काही व्यक्तीकडून नाशिक जिल्ह्याला सापत्न वागणुक दिली जात असल्यामुळे सर्व विद्यार्थी संघटना आणि नाशिककरांमध्ये संतप्त भावना होती. नाशिक उपकेंद्र विकासात खोडे घालणाऱ्या प्रवृत्ती विरोधात त्यामुळे सर्व विदयार्थी संघटना एकत्र आल्या. त्यानंतर विदयार्थी संघटनांच्या आक्रमकतपुढे विद्यापीठ प्रशासन नरमले. आज तीन मुख्य मागण्या मान्य केल्या. त्यात नाशिक उपकेंद्रांच्या वाढीव बांधकामाला मंजुरी देत विद्यापीठाने वर्क ऑर्डर काढली. आगामी अकॅडमीक कौन्सिल बैठकीत नाशिकला BBA कोर्स सुरू करण्यासंदर्भात मंजुरी देणार असल्याचे मान्य केले. नाशिक जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या प्रलंबित CAS कमिटी ४ दिवसात देणार असल्याचे मान्य केले. त्यामुळे २०० हून अधिक प्राध्यापकांच्या प्रमोशनचा मार्ग मोकळा होणार आहे.
विद्यार्थी संघटनांनी उपकेंद्र विकासासाठी राज्यपाल तथा कुलपतींची गाड्या अडवण्याची भूमिका जाहीर केली होती. नाशिकमधील १७ विद्यार्थी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यांनंतर abvp, विद्यापीठ विकास मंचचे नेते प्रसेनजीत फडणवीस, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य आदींनी आज विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर प्रशासनाने नाशिककरांच्या वरील महत्वाच्या मागण्या करण्या संदर्भात तत्काळ कार्यवाही केली.
भूमिकेचे स्वागत
नाशिक उपकेंद्र विकासातला अडथळा दूर केल्याबद्दल कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी सर, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे यांचे आभार. कुलगुरू पालक आहेत. त्यांनी उपकेंद्राचे पालकत्व घेण्याचे मान्य केले आहे. आम्ही त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करतो…. त्यांच्याबद्दल आता मनात कुठलाही राग असण्याचे कारण नाही. संक्रांतीला तिळगुळ द्यायला जाऊ.
सागर वैद्य
व्यवस्थापन परिषद सदस्य