माणिकराव खुळे
दिवसांगणिक वेगात होणाऱ्या सध्याच्या वातावरणीय बदलातून रविवार ७ जानेवारी पर्यंत मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाचा अंदाज कायम टिकून राहण्याची शक्यता जाणवते. विदर्भ मराठवाड्यात हे वातावरण कदाचित फक्त आज व उद्यापर्यंतच टिकून राहू शकते, असे वाटते.
आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री से. ग्रेड व दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. पहाटेचे किमान तापमाने सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा ४ डिग्री से. ग्रेडअधिक आहे, तर दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या पातळीत आहे. ही दोन्हीही तापमाने रविवार दि.७ जानेवारीपर्यंत याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकणात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे २० डिग्री से. ग्रेड व दुपारचे कमाल तापमान ३०-३२ डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे.
तेथील ही दोन्हीही तापमाने सध्या त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा २ डिग्री से. ग्रेडने अधिक आहे, ही दोन्हीही तापमाने रविवार दि.७ जानेवारीपर्यन्त ह्याच पातळीत राहण्याची शक्यता जाणवते.
विना अडथळा उत्तरेकडून अधिक उंचीवरून मुंबईत येणारे थंड कोरडे वारे व निम्न पातळीतून दक्षिण भारतातूनही पूर्वदिशा झोताचे आर्द्रतायुक्त वारे, कि ज्यांचे सह्याद्रीमुळे दिशा बदलातून गुजराथच्या डांगी घळीतून सध्या मुंबईत प्रवेशित होत आहे. ह्या दोन वाऱ्यांच्या संयोगातून महाराष्ट्राबरोबर मुंबईत ढगाळ वातावरण जाणवत आहे.
परंतु ढगाळ वातावरणामुळे कमी सूर्यप्रकाश व समुद्रसपाटीमुळे मुंबईत सध्य:स्थितित असलेला हवेचा उच्चं दाब व त्यात मुंबईतील धुरयुक्त प्रदूषित शांत हवा ह्या तिघांच्या एकत्रित परिणामातून जमिनीलगतच धुरयुक्त धुक्याचे (स्मोक +फॉग =स्मॉग)मळभ सध्या मुंबईत जाणवत आहे.
आणि मुंबईत हे वातावरण कदाचित पुढील ३ दिवस म्हणजे रविवार ७ जानेवारी पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune