नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोविंदनगर येथील जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरण व कोठावळे मळ्यात बॉक्स कल्व्हर्ट बांधण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आर्थिक तरतूद धरण्यापासून वर्कऑर्डरनंतर काम सुरू होईपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केलेल्या सतत दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महापालिका प्रशासनाचे प्रभागातील नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.
गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकचे नूतनीकरण करणे व नंदिनी नदीवर गॅबियन वॉल बांधण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, यासाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने १३ डिसेंबर २०२१ रोजी निवेदन देण्यात आले. तत्कालीन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ८ फेब्रुवारी २०२२ च्या अर्थसंकल्पात गॅबियन वॉलसाठी १ कोटी ६४ लाख ९० हजार रुपयांची, तर जॉगिंग ट्रॅकसाठी ७५ लाखांची तरतूद केली. बदललेली दर सूची व जीएसटीसह २०२३-२४च्या अर्थसंकल्पात याच गॅबियन वॉलसाठी वाढीव रक्कमेसह १ कोटी ९७ लाखांची तरतूद धरण्यात आली आहे. बडदेनगर, पाटीलनगर १८ मीटर रस्त्यालगत कोठावळे मळ्यात नाल्यावर बॉक्स कल्व्हर्टसाठी दोन कोटींची तरतूद प्रशासनाने केली होती. मात्र, त्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत नव्हता. यासाठी ९ जून २०२२ रोजी यासंदर्भात आयुक्तांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. या तीनही कामांच्या निविदा २५ एप्रिलला जाहीर झाल्या. राजकीय दबावामुळे प्रशासन या निविदा उघडत नव्हते. शेवटी नंदिनी नदीत आंदोलन करण्याचे निवेदन दिल्यानंतर या निविदा उघडण्यात आल्या. यानंतर वर्कऑर्डर काढून काम सुरू होईपर्यंत सतत पाठपुरावा करण्यात आला. यापैकी अखेर जॉगिंग ट्रॅक व बॉक्स कल्व्हर्टचे काम सुरू झाले आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, भारती देशमुख, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, रवींद्र सोनजे, मनोज वाणी, सतिश मणिआर, नीलेश ठाकूर, डॉ. शशीकांत मोरे, बाळासाहेब राऊतराय, अनंत संगमनेरकर, अशोक पाटील, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, बाळासाहेब देशमुख, बापूराव पाटील, बाळासाहेब तिडके, फकिरराव तिडके, डॉ. प्रतापराव कोठावळे आदींसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.