नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक परिक्षेत्रात वर्षभर अमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत ठिक ठिकाणी छापेमारी करीत पोलिसांनी तब्बल सव्वा आठ कोटी रूपयांचा अमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत ४५८ जणांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी एमडीपीएस कायद्यातर्गत ३३९ गुन्हे दाखल केले आहेत.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रतील नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर जिह्यात पोलिस ठाणे निहाय अमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमेतर्गत एनडीपीएस कायद्यान्वये ३३९ गुन्हे दाखल करण्यात येवून ४५८ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. वर्षभर सुरू असलेल्या या कारवाईत गांजा,अफू, मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर,कुत्ता गोली आणि गुंगीकारक औषधे असा सुमारे ८ कोटी ३९ लाख ९६ हजार ६३८ रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. अमली पदार्थच्या आहरी गेलेल्या तरूणाईला रोखण्यासाठी पोलिसांकडून शाळा महाविद्यालय परिसरात पेट्रोलींग वाढविण्यात आली असून विद्यार्थी पालकांशी संवाद साधून जनजागृती केली जात आहे. या उपक्रमांतर्गत नंदूरबार जिल्हा नशामुक्त घोषीत करण्यात आला असून, पथकांकडून कंपन्या,गोडावून व बंद गोडावूनवर छापेमारी सुरू आहेत.
नागरिकांना तात्काळ माहिती द्यावी
अमली पदार्थ विक्री, बाळगणे अथवा ताब्यात ठेवणे बाबत माहिती असल्यास नागरीकांनी डायल ११२ अगर पोलिस सहकार्य दुरध्वनी क्रमांक १०० यावर अथवा गोपनिय पत्राद्वारे तात्काळ पोलिसांना द्यावी.
डॉ.बी.जी.शेखर
विशेष पोलिस महानिरीक्षक ,नाशिक परिक्षेत्र