नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १ कोटी ८१ लाखात मखमलाबाद शिवारातील शेत जमीन वृद्ध महिलेचे बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वृध्देच्या नातूने न्यायालयात दाद मागितल्याने हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन त्र्यंबकराव मंडलिक (३२, रा. आनंदवली), किशोर विष्णू शिंदे (४२, रा. आनंदवली), सुरेश कारभारी गांगुर्डे (५५, रा. कामगारनगर, सातपूर), उदय भास्करराव शिंदे (५५, रा. मेघदूत शॉपिंग सेंटर, सीबीएस), अशा संशयितांची नावे आहेत. चौघांनी जन्म मृत्यू रजिस्टरमध्ये फेरफार केली. बाळू वनाजी माळी यांचे अपत्य मयत असताना संशयितांनी जन्म मृत्यू रजिस्टरमध्ये मुक्ता नावाची फेरफार केली. वृद्ध महिला माळी यांचे वारसदार असल्याचे दर्शविले. काही को-या कागदांवर महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेतले. मखमलाबाद शिवारातील शेतजमीन मिळकत क्रमांक ३२/२/१ यासी क्षेत्र २५९४.३९ चौरस मीटर पैकी १२९७.१९ चौरस मीटर क्षेत्राचा खोट्या आशयाचे साठेखत आणि करारनामा तयार केला. करारनामा तयार केलेली जमीन १ कोटी ८१ लाखात विक्री केल्याचे भासविले.
त्यापैकी ३१ लाख रूपये तक्रारदार यांच्या आजी अर्थात वृद्ध महिलेच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे दर्शविण्यात आले. संबंधित जमिनीशी वृद्ध महिलेचा कुठलाही संबंध नसताना त्यांना वारस दाखवून त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारदार भूषण भीमराज मोटकरी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान घडलेला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाकडून भद्रकाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेशित करण्यात आले असून त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत.