मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावामध्ये उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या अमन परदेशीने हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार केल्यानंतर सुषमा अंधारे यांच्यावर भा. द. वि. कलम २९५ (अ) नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीत हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी मुद्दाम हिन दर्जाचे अश्लील शब्द प्रयोग केल्याचा आरोप करत ही तक्रार परदेशी यांनी केली. ललित पाटील ड्रग्स प्रकरणात तडजोडीसाठी अमन परदेशीचे नाव सुषमा अंधारे यांनी सभेतील भाषणात घेतले होते. त्यांनीच ही तक्रार केली आहे.
मालेगावमध्ये उध्दव ठाकरे गटाच्या गटाच्या अडचणीत रोजच वाढत आहे. याअगोदर उपनेते अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात टाकले. त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. आता पाठोपाठ सुषमा अंधारे यांच्यावर देखील मालेगावात गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.