इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीचे अजित पवार व शरद पवार गट दोन्ही आमने सामने आले. अजित पवारांच्या गटाने जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर अजित पवार गटाने रामाची आरती करून आव्हाडांचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला पण, यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वर्तक नगर पोलिसांनी ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरेंद्र वाघमारेंसह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टीका होत असतांना ठाण्यात दोन्ही गट आमने सामने पहिल्यांदाच आले.
या घटनेनंतर आ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागेल. श्री रामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की, त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला.
पण, सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हानून पाडू आम्ही ! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्री राम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत.