इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील चिंतन शिबिरात एक वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. आव्हाड यांनी राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्यांनी १४ वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असा प्रश्नही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शिकार करून खाणारा राम आमचा आहे. आम्ही आज मटण खातो. राम बहुजनांचा आहे. आम्ही रामाच्या पावलावर चालतो. असेही ते म्हणाले.
या त्यांच्या वक्तव्यानंतर काळाराम मंदिराचे पुजारी आणि महंत सुधीर दास यांनी आव्हाडांचा निषेध करत सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांचं श्रीरामांबद्दलच विधान अत्यंत मूर्खपणाच आहे. श्रीरामांनी फळं, कंदमुळे खाऊन १४ वर्षांचा वनवास भोगला, वाल्मिकी रामायणात याबाबत उल्लेख आहे. देशातील वातावरण राममय झालेला असताना राक्षसांना जसा त्रास होतोय तसाच त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतो असेही सुधीर दास यांनी सांगितले.
तर अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत अनिकेत शास्त्री यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर लवकरात लवकर सरकारने कारवाई करावी असे सांगितले. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं, त्यांच्यावर उपचाराची गरज, त्यांना याची फळं भोगावी लागतील. जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकला येऊन प्रभू श्रीराम, रामायणावर शास्त्रार्थ करावा आणि मगच रामावर बोलावे असेही ते म्हणाले.