पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी लेटर बॉम्ब टाकत कुलगुरु आणि प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर नाशिकच्या विदयार्थी संघटनांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. बुधवारी या सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. त्यांनी हॅाटेल करी येथे पत्रकार परिषद घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा निषेध केला.
या पत्रकार परिषदेला संबोधीत करतांना अॅड. अजिंक्य गीते यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि काही व्यक्तीकडून नाशिक जिल्ह्याला दिली जात असलेल्या सापत्न वागणुकी बद्दल सर्व विद्यार्थी संघटना आणि नाशिककरांमध्ये संतप्त भावना आहे. नाशिक उपकेंद्र विकासात खोडे घालणाऱ्या प्रवृत्ती विरोधात सर्व विदयार्थी संघटनांनी एकत्र आल्या आहे.
नाशिक उपकेंद्र बांधकाम, प्रस्तावित SOP, प्राध्यापक पदोन्नती, CAS प्राध्यापक भरती असे अनेक विषय असून त्यावर आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय़ घेतला आहे. कुलगुरु म्हणतात नाशिकला द्यायला ५ कोटी नाही अगोदरच १०० कोटीचे काम केले. नाशिकच्या २ लाख २५ हजार विद्यार्थ्यांचा हा विषय आहे. यावेळी त्यांनी वेळ पडल्यास आम्ही भीक माँगो आंदोलन, स्वाक्षरी मोहिम व वेळ पडल्यास पुणे विद्यापीठात जाऊन जाब विचारु असे अॅड. गीते यांनी सांगितले. यावेळी सर्वपक्षीय विदयार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.
…………
व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी कुलगुरु यांनी हे पत्र लिहले आहे…
मा कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
विषय – विद्यापीठात सुरू असलेल्या मनमानी कारभार, गैरप्रकारांबद्दल….
मा. कुलगुरू महोदय,
नगर आणि नाशिकच्या उपकेंद्रांच्या बाबतीत कुलगुरू आणि काही झारीतल्या शुक्राचार्यांची भूमिका आकस, द्वेष भावनेतून सुरू आहे असं दिसतंय. त्यामुळे नाही म्हणायचं नाही आणि करायचं काहीच नाही अशी आपली कार्यपद्धती दिसून येत आहे, याबद्दल आमची तीव्र नाराजी आहे. विद्यापीठ अधिसभा, व्यवस्थापन परिषदेच्या ठरावांना केराची टोपली दाखवत विद्यापीठ कायद्याचा भंग करण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. विरोध केलेले वादग्रस्त ठराव मंजूर करून घेतल्याचे दाखवून सभागृहाची फसवणूक केली जात आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या विभागांना कोट्यवधींचा निधी वाटला जातो आहे. सोयीने सभा घ्यायच्या आणि सोयीने त्यातील विषयांना विरोध असला तरी मंजुरी घ्यायचा प्रकार सुरू आहे.
विद्यापीठ कामासंदर्भातील अनेक फाईल्स आपल्याकडे अनेक महिने प्रलंबित राहत आहेत. CAS प्राध्यापक भरती, नेट सेट स्क्रुटीनी, प्रमाद समिती सह अनेक समितीचे विषय 3-4 महिने होऊनही प्रलंबित राहतात. अनेक प्रकारचे कामे करून घेण्याची विद्यापीठातील ठेकेदारी देण्याची पद्धत सदोष आहे. BWC च्या बैठका नियमित घेतल्या जात नाही. जेव्हा झाल्या, त्या तहकूब करून त्याचे मिनिट्स ही दिले जात नाही. याबद्दल सभागृहाने आपणास वारंवार लक्ष वेधुनसुद्धा ऐनवेळी मुदतवाढीचे ठराव आणून काही ठराविक ठेकेदार पोसण्याचा उद्योग विद्यापीठात सुरू आहे. आजच्याही सभेत असे काही प्रस्ताव आहेत
विद्यापीठ महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राचार्य ठेवण्यासाठी नोटीस पाठवत आहे. मात्र विद्यापीठातील डीन, कुलसचिवांसारखी पदे अनेक महिन्यापासून प्रभारी यांचे भरवशावर आहेत. अनेक विभागांत एक एक अधिकाऱ्यावर ३-३ विभागांचे प्रभार आहेत. यावर काहीही ठोस उपाययोजना करण्याचे प्रयत्न आपल्याकडून होताना दिसत नाही. आपण या विद्यापीठात आल्यापासून या विद्यापीठाच्या नावलौकिकाला धुळीस मिळवण्याचा जणू चँग बांधला आहे असं दिसतंय. प्रस्तावित SOP हा त्याचे उदाहरण आहे. या SOPच्या माध्यमातूनही विद्यापीठातील लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय. संघटना नको,आंदोलन नको, चळवळ, उत्सव काहीच नको, गैरप्रकारांवर कुणाचा आवाज नको. काही ठराविक लोकांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मर्जीनुसार विद्यापीठ चालवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. खाजगी विद्यापीठ करून या दैदिप्यमान वारसा असलेल्या संस्थेला खाजगी संस्थेत आपल्याला रूपांतरित करायचे आहे का…? आपले हुकूमशाही इरादे आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाही.
या सर्व विषयांवरील नाराजी मी आपणास या पत्राद्वारे व्यक्त करीत आहे. हे विद्यापीठ लाखो विद्यार्थी आणि शेकडो संस्थांचे आहे. कुणा एक दोघांची मालकीचे नाही. त्यामुळे आपण पालकांच्या भूमिकेत असावे, मालकाच्या नव्हे…! भविष्यात यात सुधारणा दिसली नाही तर नाईलाजाने मला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारावे लागेल. त्यावेळी या प्रत्येक मुद्द्यावरील सखोल पुरावे आणि कागदपत्रे आम्ही जाहीरपणे समाजासमोर ठेवू याची नोंद आपण घ्यावी, अशी आपणास विनंती आहे.
सागर अनिल वैद्य,
व्यवस्थापन परिषद सदस्य