नाशिक (प्रतिनिधी)- रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेची भव्य परिषद नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि.६ व रविवार दि.७ जानेवारी रोजी ग्रेप काउंटी येथे होणाऱ्या रोटरी परिषदेत प्रमुख वक्ते गुरु गौरांगादास प्रभु मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर, दिग्गज दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, मेजर जनरल संजयकुमार विद्यार्थी, आयपीएस कृष्ण प्रकाश, भारती ठाकूर, पियुष सोमाणी, पल्लवी उटागी, भक्ती शर्मा आदी मान्यवर उपस्थितांना संबोधित करणार आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या गव्हर्नर आशा वेणूगोपाल यांनी ही माहिती दिली.
रोटरी क्लब ही सेवाभावी संस्था जगभरातील वंचितांच्या आणि दुर्लक्षित लोकांच्या समस्या निवारण करण्यासाठी कटीबद्ध आहे. सर्वांना शुद्ध पिण्याचे पाणी, मूलभूत आरोग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता रोटरी ही संस्था सातत्याने प्रयत्न करत असते.
रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्व सदस्य, ज्यांचा रोटेरीयन्स असा उल्लेख करण्यात येतो, ते समाजात शाश्वत परिवर्तन घडवून आणण्यासाठी कायम प्रयत्न करतात. यावर्षी आरआयडी ३०३० च्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून आशा वेणूगोपाल यांनी इतिहास रचला आहे. समाजातील विविध गरजू घटकांच्या मदतीसाठी त्यांनी अनेक कल्पक व नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतले आहेत. त्या प्रतिष्ठित आर्क क्लम्फ सोसायटीच्या सदस्या असून त्यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्यात २,५०,००० युएस डॉलर्सचे योगदान दिले आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील ५५५५ विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी सायकली वितरीत करण्यात आशा वेणूगोपाल यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच त्यांनी मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. मनोज चोपडा यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यात वैद्यकीय प्रकल्प हाती घेतला आहे.त्यात रुग्णांच्या रोगनिदानापासून ते उपचारांपर्यंत विनामूल्य सेवा देण्यात येतात.
१० वर्षांनंतर नाशिकमध्ये होणाऱ्या ह्या भव्य परिषदेत देश विदेशातून १६०० पेक्षा जास्त रोटरी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यावेळी होणारी ही परिषद सर्व रोटरी क्लबकरिता तसेच समाजासाठी व विविध प्रकल्प, उपक्रमांसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरेल. मान्यवर वक्ते त्यांचे समृद्ध अनुभव सांगून समाजोपयोगी अभिनव कल्पना मांडतीलअसे संयोजकांनी कळवले आहे. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी नाशिक आणि परिसरातील सर्व रोटरी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.