नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुलांसोबत झालेल्या भांडणाची कुरापत काढून संतप्त दोघांनी मायलेकींना मारहाण करीत रोकड लुटून नेल्याची घटना हिरावाडीत घडली. या घटनेत भामट्यांनी घरातील पैश्यांची पिशवी लांबविली असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषी धात्रक व मंथन धात्रक (रा.गणपती मंदिरामागे,हिरावाडी) अशी महिलेच्या घरात शिरून जबरीचोरी करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत शोभाबाई नामदेव नाईक (५५ रा.कोळीवाडा,पाटाजवळ,हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित दोघांचा तक्रारदार महिलेच्या मुलांशी वाद झाला होता. या वादाची कुरापत काढून संशयितांनी महिलेच्या घरात घुसून मारहाण करीत ही जबरीचोरी केली.
मंगळवारी (दि.२) महिला व तिची मुलगी घरात असतांना संशयितांनी प्रवेश करून दोघींना शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. यावेळी संतप्त दोघांनी लोखंडी वस्तू आणि काठीच्या सहाय्याने घरसामानाची तोडफोड करून नुकसान केले. तसेच सुमारे २६ हजार रूपयांची रोकड असलेली कापडी पिशवीही बळजबरीने चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.