सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे एनडीएच्या धर्तीवर महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी २४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या केंद्रासाठी पर्यटन विभागाची जागा महाज्योतीकडे हस्तांतरित करावी तसेच वर्षभर नायगाव येथे पर्यटक येतील या दृष्टीने नायगावचा विकास करावा अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित नायगाव जि.सातारा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ओबोसी बहुजन विकास मंत्री अतुल सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आ.महादेवराव जानकर, आ.जयकुमार गोरे, आ.मकरंद पाटील, आ.महेश शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक उभारणीरत स्व.प्रा.हरी नरके यांनी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिल. ते आज नाही त्याच अतिशय दु:ख होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई या महापुरुषांना आदरांजली वाहण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नेहमीच जायला हवं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो पायंडा पाडला. याचा आम्हाला विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांना शाळा सुरु करण्यासाठी फातिमाबी शेख यांनी विशेष मदत केली. त्यांना देखील मी अभिवादन करतो. आज या महिलांनी घेतलेल्या विशेष प्रयत्नांमुळे आज एसटी चालक ते अंतराळात व राष्ट्रपतीपदापर्यंत महिला काम करताय. सावित्रीबाई फुले यांनी साहित्याच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. समाजात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांनी योगदान दिल. प्लेग सारखा गंभीर आजार पसरला असतांना त्यांनी स्वतः दवाखाना सुरु केला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी प्लेगच्या रुग्णांची सेवा केली. अगदी आता सीमेवर ज्या हिमतीने महिला लढता आहे. त्या काळी त्याच हिमतीने त्या लढल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मुलींनी शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी ३२ वर्षापूर्वी शासनाने उपस्थिती भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार मुलींना १ रुपया उपस्थिती भत्ता देण्यात येतो. आता या निधीत वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मुलींची संख्या वाढेल. भिडे वाडयाचा लढा आपण जिंकला असून या येथील स्मारकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष मदत केली आहे. तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विस्तारासाठी देखील १०० कोटी रुपयांची घोषणा अजितदादा पवार यांनी केली आहे. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार त्यांनी मानले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार सन २०१४ पासून बंद झाला आहे. तो पुरस्कार पुन्हा सुरु करण्यात यावा अशी मागणी करावी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे वर्षभर पर्यटक येतील या दृष्टीने दहा एकर जागा घेऊन याठिकाणी स्मारकाचा विकास करण्यात येईल यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.