नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम भागात पेटचा दिवा अंगावर पडल्याने भाजलेल्या ८० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला.यात वृध्दा ९० टक्के भाजल्या होत्या. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शकुंतला दत्तात्रेय पाटील (रा.गंगोत्री विहार,बिडीकामगार नगर,अमृतधाम) असे मृत वृध्देचे नाव आहे. पाटील मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास अंगावर पेटता दिवा पडल्याने गंभीर भाजल्या होत्या. सून वर्षा पाटील यांनी तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता सायंकाळी उपचार सुरू असतांना डॉ. हेमंत देवरे यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
जुगार खेळणा-या दोघांवर पोलिसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाखलगाव परिसरात उघड्यावर जुगार खेळणा-या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक रामा धोत्रे (रा.एकलहरे झोपडपट्टी) व मोहम्मद रियाज शेख (रा.कुंभारवाडा चाटोरी) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. लाखलगाव येथील तन्मय हॉटेल मागे दोन जण जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता संशयित अंक आकड्यावर पैसे लावून टाईम नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले.
संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याबाबत शिपाई सचिन बाहिकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार काटकर करीत आहेत.