नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चारीत्र्याचे संशयावरून घरातील वस्ता-याने पत्नीच्या गळयावर वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या पतीला न्यायालयाने ७ वर्ष सश्रम कारवास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी आहे. पंचवटी पोलीस ठाणेच्या हददीत ३० जुलै २०२० रोजी ही घटना घडली होती.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या गुन्हयातील आरोपी व पीडित हे नात्याने पती-पत्नी आहे. सदर गुन्हयातील आरोपी दिपक वसंत पवार (३२) रा. चामुंडा पार्कचे मागे, व-हाडे यांचे घरात, समर्थ नगर, पंचवटी, नाशिक याने चारीत्र्याचे संशयावरून घरातील वस्ता-याने पत्नीच्या गळयावर वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पती विरूध्द पंचवटी पोलीस ठाणेत भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल कासर्ले, तत्कालीन नेमणूक पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर, यांनी केलेला असून त्यांनी आरोपीतांविरूध्द सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने तपास केला व आरोपींविरुध्द जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.
आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय २ चे न्यायाधीश एन. व्ही. जिवणे यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरुध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीला सात वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणुन सुधीर कोतवाल यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा. एम.एम. पिंगळे, नेमणूक पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर व सपोउपनिरी के.के. गायकवाड, नेमणुक -अभियोग कक्ष, नाशिक शहर यांनी सदर गुन्हयात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.