नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ५ ते २० जानेवारी या कालावधीत खासदार भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते ५ जानेवारीला (शुक्रवार) वर्धा मार्गावरील छत्रपती सभागृहात या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम भक्ती ही स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नागपूरकरांना पंधरा दिवस भक्तीचा मेळा अनुभवता येणार आहे. ६ विभागातून जवळपास ३२५ उत्साही महिला व पुरुष भजनी मंडळांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. स्पर्धक भजनी मंडळांना दोनपैकी एक गीत श्रीरामाचे, दुसरे गीत हे गोंधळ, जोगवा, अभंग यापैकी १ अशी दोन गीते १० मिनीटांच्या अवधीत सादर करायचे आहे. महाअंतिम फेरीसाठी सहा विभागांतून प्रत्येकी दोन अशा एकूण १२ भजनी मंडळांची निवड होईल. शुक्रवार ५ जानेवारीला वर्धा मार्गावरील छत्रपती सभागृहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते दक्षिण पश्चिम विभागाच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन होईल.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजीव हडप, भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रगती पाटील, दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष रितेश गावंडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. पश्चिम विभागाची स्पर्धा ६ जानेवारीला रामनगर येथील श्रीराम मंदिरात असून माजी खासदार अजय संचेती यांची प्रमुख उपस्थिती असेल. ७ जानेवारीला गुरुदेवनगर येथील हनुमान मंदिरात पूर्व विभागाच्या स्पर्धेला आमदार कृष्णा खोपडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. १२ जानेवारीला दक्षिण विभागाच्या स्पर्धेला आमदार मोहन मते, १३ जानेवारीला मध्य व उत्तर विभागाच्या स्पर्धेला आमदार विकास कुंभारे आणि आमदार प्रवीण दटके यांची प्रमुख उपस्थिती असेल. १२ व १३ जानेवीराल श्री संत गुलाबबाबा आश्रम येथे स्पर्धा होणार आहे.
खासदार भजन स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले असून माया हाडे, श्रद्धा पाठक, सुरेश गुप्ता, रंजना गुप्ता, अभिजित मुळे, विश्वनाथ कुंभाळकर, भोलानाथ सहारे, वंदना कुलकर्णी, मोहन महाजन, अतुल सगुलले, लक्ष्मी राया, लता खापेकर, मनीषा दुबे , डॉ. अजय सारंगपुरे आयोजनासाठी विशेष परीश्रम घेत आहेत.