नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॅनडा कॉर्नरच्या सराफी शोरूममध्ये ऑनलाईन पेमेंट केल्याचा संदेश दाखवून भामट्या ग्राहकाने सोनसाखळी लंपास करत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल ६७ हजाराचे लॉकेट भामट्याने लांबविले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार रवी पटेल असे भामट्या ग्राहकाचे नाव आहे. याबाबत चयनिका तापस बरूआ (रा.पांडवनगरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. बरूआ कॅनडा कॉर्नर येथील ब्लुस्टोन या सराफी शोरूमचे काम बघतात. गेल्या २७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रवी पटेल नामक ग्राहक शोरूममध्ये लॉकेट खरेदीसाठी आला होता. यावेळी त्याने सोनसाखळी पसंत करीत ऑनलाईन पैसे पाठवित असल्याचे सांगितल्याने बरूआ यांनी त्यास दुकानातील कोड स्कॅनर दिले.
मोबाईलमध्ये कोड स्कॅनर स्कॅन करून ६६ हजार ४३५ रूपये पाठविल्याचा संदेश दाखविल्याने बरूआ यांचा विश्वास बसला. भामटा ग्राहक निघून गेल्यानंतर पैसे खात्यात जमा न झाल्याने बरूआ यांनी तपासणी केली असता भामट्याने खोटा मेसेज दाखविल्याचे समोर आले. पोलिस शो रूममधील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे भामट्याचा शोध घेत असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.