नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या श्रावणी श्रीकांत पाटील हीने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्राच्या १४ वर्षे वयोगटाच्या संघामध्ये स्थान मिळविले. श्रावणी अशोका युनिव्हर्सल, चांनसी शाळेची खेळाडू असून ती पंचवटी येथील अपेक्स अकॅडमी येथे नियमित सराव करते.
श्रावणी हीची महाराष्ट्राच्या संघामध्ये दुसऱ्यांदा निवड झाली आहे या अगोदर श्रावणी हीने महा बास्केट बॉल संघटने मार्फत, पौंडेचरी येथे झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेत ब्राँझ पदक प्राप्त करून महाराष्ट्र संघाला रोख एक लाख पारितोषिक मिळवण्यात मोलाची कामगिरी केली होती. याचबरोबर श्रावणीने पुणे आणि कोल्हापूर येथे आयोजित राज्य स्पर्धेत सहभाग नोंदवून तेथेही नाशिक संघाकडून चांगला खेळ करून उप उपांत्य फेरीपर्यंत मजलमारली होती. नाशिक येथे पार पडलेल्या या स्पर्धेमधून महाराष्ट्र संघात निवड झालेल्या संघाचे प्रशिक्षण शिबिर डेक्कन जिमखाना, पुणे येथे कालपासून सुरू झाले असून महाराष्ट्राचे संघ दिनांक ७ ते १३ जानेवारी, २०२४ दरम्यान बारमेर, राजस्थान येथे आयोजित ६७ व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
श्रावणीला मीनाताई ठाकरे येथील इनडोअर हॉलमध्ये क्रीडा मार्गदर्शक राजेश क्षत्रिय यांच्या कडून गेल्या दोन वर्षापासून मार्गदर्शन मिळत आहे. श्रावणी आपल्या यशाचे श्रेय आपले प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, शाळेचे प्राचार्य आणि क्रीडा शिक्षक राजू शिंदे, गायत्री भिंगे, अक्षद क्षत्रिय, विवेक गायकवाड, आनंद द्रविड तसेच आपले आई- बाबा अनुपमा आणि श्रीकांत पाटील यांना देते. श्रावणीची या खेळातील प्रगती बघता ती भविष्यातील नाशिकची स्टार खेळाडू होणार असा विश्वास असून तीला या स्पर्धेसाठी नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातील मान्यवरानी शुभेच्छा दिल्या.