नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्या घेऊन ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभरात ओबीसी एल्गार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर आणि बीड येथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या सभांना भटके विमुक्त ओबीसी एसबीसी आणि अल्पसंख्याक समाजातील बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत.
ओबीसी आरक्षण बचावासाठी शनिवार, ६ जानेवारी रोजी पंढरपूर येथे आणि शनिवार १३ जानेवारी रोजी बीड येथे ओबीसी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते सहभागी होणार आहे. या सभेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
या सभेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी एल्गार देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना जनगनना करण्यात यावी, मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी, खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जीआर ताबडतोब रद्द करावा या ओबीसींच्या मागण्या आहेत.