मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वांद्रे येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२३-२४ ला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज भेट दिली. या प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू, ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावचे भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत ग्रामीण भागातील चव चाखण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला संधी मिळत असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे उपंचालक महेश कारांडे, अवर सचिव धनवंत माळी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.