नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे २० हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. विकास प्रकल्पांमध्ये तामिळनाडूमधील रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि जहाजबांधणी क्षेत्रांचा समावेश आहे.
मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी सर्वांना नवीन वर्ष यशदायी आणि भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या आणि २०२४ मध्ये त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम तामिळनाडूमध्ये होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, ऊर्जा आणि पेट्रोलियम पाइपलाइन या क्षेत्रातील प्रकल्पांसाठी राज्यातील जनतेचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की आजचे २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे प्रकल्प तामिळनाडूच्या प्रगतीला बळ देतील. यापैकी अनेक प्रकल्पांमुळे प्रवासाला चालना मिळेल आणि राज्यात हजारो रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
तामिळनाडूसाठी गेल्या तीन बिकट आठवड्यांचा संदर्भ देताना, अतिवृष्टीमुळे झालेली जीवितहानी आणि मालमत्तेचे लक्षणीय नुकसान याबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आणि “केंद्र सरकार तामिळनाडूच्या लोकांच्या पाठीशी उभे असून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत असल्याचा दिलासा त्यांनी दिला.
नुकतेच निधन झालेल्या थिरू विजयकांत यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “ते केवळ चित्रपट क्षेत्रातच नव्हे तर राजकारणातही ‘कॅप्टन’ होते. त्यांनी आपल्या कामातून आणि चित्रपटातून लोकांची मने जिंकली आणि राष्ट्रहिताला सर्वांत प्राधान्य दिले. त्यांनी देशासाठी अन्न सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या दिवंगत डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पुढील २५ वर्षांसाठी स्वातंत्र्याचा अमृतकाळ भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. विकसित भारतचा विचार करताना त्यांनी आर्थिक आणि सांस्कृतिक दोन्ही पैलूंचा उल्लेख केला कारण तामिळनाडू हे भारताच्या समृद्धीचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “तामिळनाडू हे प्राचीन तामिळ भाषेचे घर आहे आणि ते सांस्कृतिक वारशाचा खजिना आहे”, असे पंतप्रधानांनी संत थिरुवल्लुवर आणि सुब्रमण्य भारती या उत्कृष्ट साहित्यकारांचा उल्लेख करताना सांगितले. त्यांनी असेही नमूद केले की तामिळनाडू हे सी व्ही रामन आणि इतर शास्त्रज्ञांसारखे वैज्ञानिक आणि तांत्रिक तज्ज्ञांचे घर आहे जे त्यांना त्यांच्या या राज्याच्या प्रत्येक भेटीत नवीन ऊर्जा देतात.
तिरुचिरापल्लीच्या समृद्ध वारशाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येथे आपल्याला पल्लव, चोल, पांड्या आणि नायक राजवंशांच्या सुशासन मॉडेलचे अवशेष सापडतात. ते म्हणाले की, परदेश दौऱ्यात कोणत्याही विषयावर बोलण्याची संधी मिळताच आपण या प्राचीन तमिळ संस्कृतीचा उल्लेख करीत असतो. “देशाचा विकास आणि वारशात तमिळ सांस्कृतिक प्रेरणांनी दिलेल्या योगदानाच्या निरंतर विस्तारावर माझा विश्वास आहे”, असेही ते म्हणाले. नवीन संसदेत पवित्र सेंगोलची स्थापना, काशी तमिळ आणि काशी सौराष्ट्र संगम यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला ज्यामुळे देशभरात तमिळ संस्कृतीबद्दल उत्साह वाढला आहे.
गेल्या १० वर्षात रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, गरीबांसाठी मोफत घरे आणि रुग्णालये यासारख्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रचंड प्रमाणावरील गुंतवणुकीची माहिती पंतप्रधानांनी दिली. आणि त्यांनी भौतिक पायाभूत सुविधांवर सरकारचा भर असल्याचे अधोरेखित केले. जगासाठी आशेचा किरण बनलेल्या जगातील अव्वल ५ अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. जगभरातून भारतात येणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, त्याचा थेट लाभ तामिळनाडू आणि तेथील लोकांना मिळत आहे कारण, राज्य मेक इन इंडियाचे प्रमुख ‘सदिच्छा दूत- शुभंकर’ बनले आहे.
पंतप्रधानांनी सरकारच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला. ज्यावेळी देशांतील राज्याचा विकास होतो, त्यावेळी त्या विकासाचे प्रतिबिंब राष्ट्राच्या विकासात दिसून येते, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या ४० हून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या वर्षभरामध्ये ४०० पेक्षा अधिक वेळा तामिळनाडूचा दौरा केल्याची माहिती त्यांनी दिली. “तामिळनाडूच्या प्रगतीबरोबरच भारताची प्रगती होईल”, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, कनेक्टिव्हिटी म्हणजेच संपर्क व्यवस्था हे विकासाचे माध्यम आहे. यामुळे व्यवसायांना चालना मिळते आणि लोकांचे जीवन सुसह्य बनते. आजच्या प्रकल्पांचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचा उल्लेख केला. या नव्या टर्मिनलमुळे विमानतळाची क्षमता तीन पटीने वाढेल आणि पूर्व आशिया, मध्य पूर्व आणि जगाच्या इतर भागांशी संपर्क मजबूत होईल. नवीन टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनामुळे गुंतवणूक, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच उन्नत रस्त्याने विमानतळाची राष्ट्रीय महामार्गाशी वाढलेली जोडणीही त्यांनी नमूद केली. पायाभूत सुविधांसह त्रिची विमानतळ जगाला तमिळ संस्कृती आणि वारशाची ओळख करून देईल याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.