नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी आज तेथील सुरक्षा परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, अजित डोवाल, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, लष्करप्रमुख, संचालक (आयबी), सीएपीएफ चे प्रमुख, मुख्य सचिव आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे डीजीपी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, अमित शहा यांनी दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांच्या क्षेत्रीय प्रभावशाली योजनेचा आढावा घेतला. सुरक्षा ग्रीडच्या कामकाजाचा आणि जम्मू आणि काश्मीरच्या एकूण सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेताना, मंत्री शाह यांनी दहशतवादविरोधी कारवाई मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आणि दहशतवादाच्या परिसंस्थेचा संपूर्ण नायनाट करण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले. असुरक्षित भागात योग्य सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा दृष्टिकोन अवलंबत राहील, याचा पुनरुच्चार गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी दहशतवादविरोधी कारवाई करताना सर्व योग्य प्रक्रियांचा अवलंब केला जावा, यावर भर दिला. तसेच शाह यांनी स्थानिक गुप्तचरांचे जाळे आणखी मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच घुसखोरीचे प्रमाण कमी झाले आहे आणि कायदा – सुव्यवस्थेतील सुधारणा झाली आहे, यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.