नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सामान्य प्रशासन विभागाकडील अधिसूचना २१ जून २०२१ नुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१ नुसार नाशिक जिल्हा परिषदेमधील एकूण ११ विभागातील ५५ संवर्गाच्या १ जानेवारी २०२४ रोजीची प्रारुप सेवाजेष्ठता याद्या श्रीमती आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबी, पदोन्नती, मानीव दिनांक व आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्याकरीता सेवाजेष्ठता याद्या हा आधार मानला जातो. मागील वर्षी देखील १ जानेवारी २०२३ रोजीच सर्व संवर्गाच्या सेवाजेष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यातील पदोन्नती, सेवानिवृत्ती, निधन, राजीनामा, सेच्छा सेवानिवृत्ती, सेवेतून बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे, सेवा संपुष्ठात आणणे इ. कारणास्तव संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नावे नविन वर्षाच्या यादीत वगळण्यात येतात आणि मागील वर्षी सेवेत हजर झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे १ जानेवारीच्या यादीत समाविष्ठ होतात.
याबाबत सर्व विभागप्रमुख यांनी सर्व सेवाजेष्ठता याद्या प्रसिद्ध केल्या आहेत व त्या याद्या जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभाग आणि पंचायत समित्या व त्याअंतर्गत सर्व कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. या याद्या जिल्हा परिषद, नाशिकच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.
जर कर्मचाऱ्यांना याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असतील तर त्यांनी प्रपत्र – ब मध्ये हरकत घेऊन व त्यानंतर कार्यालय प्रमुख यांनी प्रपत्र- क मध्ये जिल्हास्तरावर सादर करावयाची आहेत, असे परदेशी यांनी कळविले आहे.
अ. क्र. विभागाचे नाव, संवर्गाची संख्या
- सामान्य प्रशासन विभाग – 09,
- ग्रामपंचायत विभाग -03,
- बांधकाम विभाग – 13,
- अर्थ विभाग – 04,
- आरोग्य विभाग -08,
- कृषि विभाग -01,
- लघुपाटबंधारे विभाग -02,
- पशुसंवर्धन विभाग -03,
- महिला व बालविकास विभाग -01,
- ग्रामीण पाणी पुरवठा -08,
- शिक्षण विभाग -03.
एकूण -55