नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील भगतसिंगनगरकडे जाणा-या मार्गावर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने २५ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन शामराव रोहिमल (रा.गौतमनगर,गरवारे कंपनीसमोर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
नितीन रोहिमल ३१ डिसेंबरच्या रात्री आपल्या पल्सर (एमएच १५ जेबी ७३२३) दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. द्वारका कडून तो विल्होळीच्या दिशेने जात असतांना भगतसिंगनगरकडे जाणाºया रस्त्यावर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिस शिपाई सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
तडिपारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यात धारदार लोखंडी तलवार मिळून आली असून, ही कारवाई चुंचाळे शिवारातील घरकुल योजना भागात करण्यात आली. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण राजेंद्र कोळी (२३ रा.घरकुल योजना,चुंचाळे शिवार ) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. कोळी याच्या गुन्हेगारी कारवायामुळे शहर पोलिसांनी त्याच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी तडिपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच होता. पोलिस त्याच्या मागावर असतांना ३१ डिसेंबर निमित्त तो आपल्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. मध्यरात्री त्यास जेरबंद करण्यात आले असून त्याच्या ताब्यातून धारदार तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी चौकीचे कर्मचारी किरण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.