नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तरुण मुले काय करतील त्याचा नेम नाही. नाशिकमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत त्याची मैत्रीच त्याच्या अंगलट आली आहे. हिरावाडीत हा प्रकार घडला असून येथे बिअरची बाटली दिली नाही या कारणातून संतप्त तरूणाने आपल्या मित्राची दुचाकी पेटवून दिली. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मित्राच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल दिनेश वावरे (२० रा.कोळीवाडा,हिरावाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी शोभा रत्नाकर धात्रक (रा.यशोमती सोसा.शक्तीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. धात्रक यांचा मुलगा व त्याचे काही मित्र ३१ डिसेंबर रोजी थर्टी फस्ट साजरा करीत असतांना ही घटना घडली.
मध्यरात्री पार्टी रंगात आलेली असतांना संशयिताने बिअरच्या बाटलीची मागणी केली. यावेळी धात्रक याने त्यास बाटली देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने पार्किंगमध्ये जावून धात्रक यांच्या अॅक्टीव्हा दुचाकीवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार संतोष घुगे करीत आहेत.