नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात मनमाड मध्ये टँकर ड्रायव्हर ट्रान्सपोर्टरने कालपासून संप पुकारल्यामुळे त्याचा थेट परिणाम आता पेट्रोलपंपावर झाला आहे. इंधन पुरवठा होत नसल्यामुळे काल पासून काही पेट्रोलपंपावर लांबच लांब रांगा तर काही ठिकाणी पेट्रोल पंप ड्राय झाले आहे. इंधन नसल्यामुळे स्कुलबसवरही परिणाम होणार आहे. तर इतर वाहतूकीलाही त्याचा फटका बसणार आहे.
या संपामुळे एकही टँकर भरून देत जात नाहीत. डीलरच्या मालकीचे सुद्धा टँकर अडवून ठेवलेले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. मनमाडच्या ऑइल डेपोमधून नाशिक व जिल्हयात इंधन पुरवठा होत असल्यामुळे हा परिणाम झाला आहे.
रस्ते आपघाताबाबत सरकारच्या जाचक व अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ वाहन चालकांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपामध्ये मनमाडच्या पेट्रोलियम प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्यां टँकर चालकांनीही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनमाड जवळच्या हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्पातून होणारा पुरवठा ठप्प झाला आहे.
या संपामुळे राज्यातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने अपघाताबाबत केलेल्या कायद्यामध्ये दहा वर्षांच्या शिक्षा आणि सात लाख दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याविरोधात चालकांमध्ये तीव्र भावना उमटल्या आहे.
पेट्रोलपंपाच्या संघटनेची भूमिका
काही दिवसापुर्वी केंद्र शासनाने Hit & Run संदर्भात कायदा करण्याची प्रक्रिया सुरु केली. या कायद्याच्या बाबतीत वेगवेगळी मते आहेत. ड्रायव्हर्सना हा कायदा जाचक वाटल्याने त्यानी अचानक या विरुद्ध आंदोलन सुरु केले. त्यात टॅंकर ड्रायव्हरनी पुढाकार घेतला. टॅंकर्स दोन प्रकारच्या असतात. एक डीलर्सच्या (त्याना DCT म्हणजे Dealer cum Transporter) म्हणतात तर दुस-या नुसत्याच पेट्रोल डिझेल वाहतूक करणाऱ्या म्हणजे ट्रान्सपोर्टरच्या असतात. त्यांचे पेट्रोल पंप नसतात. सदरचा संप हा ट्रान्सपोर्टरच्या ड्रायव्हर्सचा असून त्यात पेट्रोल पंप चालकांचा कोणताही सहभाग नाही. संपावरील ड्रायव्हर्सचे आंदोलन डेपोसमोर होत असल्याने डेपोला सोमवारी कोणत्याही टॅंकर्स भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे गावोगावी पुरवठा झाला नाही. उशिराने प्रशासनाने लक्ष घातल्याचे समजते आहे. संप ३ दिवसासाठी जाहीर झाला आहे. पण प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर काही डेपोमधून काही लोडस् बंदोबस्तात भरायला सुरवात झाली आहे. जर हा संप मिटला तर पुरवठा सुरळीत होईल अशी आशा आहे फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.