नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. घोलप काही दिवसांपासून नाराज आहे. त्यामुळे त्यांनी ही भेट घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याच्या ते तयारी आहेत. ठाकरे गटाने माजी खासदार भानुदास वाकचौरे यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज आहे.
माजी मंत्री असलेले घोलप यांनी काही महिन्यापूर्वी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा ठाकरे गटाने प्रयत्नही केला. पण, त्यांची नाराजी काही दूर झाली नाही. त्यांना संपर्क प्रमुखपदावरुन हटवल्यामुळे ते नाराज होतेच. आता त्यांनी थेट शिंदे यांची भेट घेऊन मोठा धक्का दिला आहे. या भेटीचा तपशील अदयाप समोर आलेला नाही. पण, शिर्डी लोकसभा निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाली असावी असे बोलले जात आहे..
बबन घोलप हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहे. त्यांनी मंत्रीपदही भूषविले आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात खासदार हेमंत गोडसे सह शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला. पण, घोलप यांनी ठाकरे गटातच राहणे पसंत केले. आता जर ते शिंदे गटात गेले तर तो ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे.