मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवकाशातील वेधशाळेसह, दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण आणि त्यांना इच्छित कक्षेत प्रस्थापित करण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्था – इस्रोने आज नववर्षाच्या प्रारंभीच विक्रम केला आहे. इस्त्रोच्या ‘एक्सपोसॅट’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. तसेच इस्रोचे आणि या मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
विशेष म्हणजे या मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील के.जे.सोमय्या महाविद्यालयाचा आहे. यासाठीही मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातील वैज्ञानिक उपक्रमशीलतेचे कौतुक करून यात सहभागी संशोधक विद्यार्थी, अध्यापक- तज्ज्ञांचे अभिनंदन केले आहे.
‘नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने भारतीयांना एक वैज्ञानिक भेट दिली आहे. चंद्रयान – 3 मोहीम, आदित्य – एल 1, गगनयान 1 या लागोपाठ यशस्वी मोहिमांनी इस्त्रोने भारतीयांची मान गौरवाने उंचावली आहे. या यशा पाठोपाठ आता अवकाश संशोधनाला मोठी गती मिळेल. ‘एक्सपोसॅट’च्या यशाने भारतीयांचा अवकाश संशोधनातील आत्मविश्वास उंचावला आहे. या यशामागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची वैज्ञानिक आणि अवकाश संशोधनाला पाठबळ देण्याची भूमिका महत्त्वाची ठरली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी इस्त्रोच्या या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांचे, संशोधक, अभियंते, तंत्रज्ञ तसेच तमाम विज्ञान जगताचे अभिनंदन केले आहे. इस्त्रोच्या पुढील सर्वच मोहिमांना, प्रयोगांसाठी सुयश चिंतिले आहे.