ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, नवी मुंबई येथे आज स्वीकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी श्री.सेठ यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी आयोगाचे सदस्य डॉ.दिलीप पांढरपट्टे, डॉ.अभय वाघ, डॉ.सतिश देशपांडे, आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात, सहसचिव श्री.सुभाष उमराणीकर, सहसचिव श्री.सुनिल अवताडे, उपसचिव श्री.मारुती जाधव, श्री.देवेंद्र तावडे, श्री.चंद्रशेखर पवार, श्री.संजय देशमुख, श्री.विपुल पवार, संशोधन अधिकारी श्रीमती राजश्री भिसे आदि उपस्थित होते.
आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात यांनी श्री.सेठ यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रचना व कार्य पध्दती विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. ही माहिती समजून घेतल्यानंतर श्री.सेठ यांनी आयोगाचा कारभार हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत अतिशय शिस्तबध्दतेने, पारदर्शकपणे करु, असे आवाहन आयोगाच्या सन्माननीय सदस्यांना व इतर अधिकाऱ्यांना केले.