मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, महागाई व अन्य भत्ते, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, मासिक पेन्शन तसेच दरम्यानच्या कालावधीत महागाई निर्देशांकाला जोडलेले किमान वेतनाइतके मानधन व मासिक पेन्शन या मागण्यांना घेऊन ४ डिसेंबर २०२३ पासून राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. आता ३ जानेवारी २०२४ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी तोडगा न निघाल्यास या मोर्चाचे रुपांतर बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार आहे.
येत्या ३ तारखेला संपाला एक महिना पूर्ण होत आहे. गेल्या महिन्याभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यामध्ये सातत्याने सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलने केली व १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानसभेच्या अधिवेशनावर महामोर्चा देखील काढला. परंतु ५ डिसेंबर रोजी महिला व बालविकास मंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली, १५ डिसेंबरला विधानभवनात उभ्या उभ्या भेट घेऊन आश्वासन दिले या पलिकडे शासनाने अजूनही या संपाची दखल घेऊन मागण्यांबाबत वाटाघाटी करून संपावर ठोस तोडगा काढलेला नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समितीने ३ जानेवारी २०२४ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी तोडगा न निघाल्यास या मोर्चाचे रुपांतर बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम,दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली.