नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाललांचा ५ जानेवारी रोजी नाशिक जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून सुत्रबद्ध नियोजन करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल महोदय यांचा संदिप विद्यापीठ येथील प्रस्तावित दौरा कार्यक्रमाबाबत पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, रविंद्र ठाकरे, अप्पासाहेब शिंदे, तहसिलदार अमोल निकम, भिमराज दराडे, पंकज पवार, शरद घोरपडे, श्वेता संचेती, शोभा पुजारी, संदिप विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी प्राध्यापक प्रमोद करोळे, निबंधक डॉ. प्रसाद बाविस्कर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यावेळी म्हणाले, दौरा अनुषंगाने नियोजित हेलिपॅड, दौरा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. वाहतुक व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे राज्यपाल महोदयांच्या ताफ्यातील वाहने यांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री करावी संदिप विद्यापीठ या ठिकाणी राज्यपाल महोदय यांची भेट प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणीही अनुषंगिक सुरक्षा व इतर बाबींच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. संदिप विद्यापीठ येथे राज्यपाल महोदय यांची निवास व्यवस्था, स्वागत त्याचप्रमाणे पदवीदान समारंभात सत्कारार्थी विद्यार्थ्यांचे नियोजनही चोख ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.