नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महामार्ग बसस्थानकात पती समवेत एस.टी.चा प्रवास करणा-या ठाणे येथील महिलेच्या बॅगेतील मंगळसूत्र चोरट्यांनी हातोहात लंपास केले. घडली. सुमारे ६५ हजार रूपये किमतीच्या सौभाग्यावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाना उत्तम मोरे (रा. वांगणी,अंबरनाथ जि.ठाणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोरे दांम्पत्य रविवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी महामार्ग बसस्थानकात आले असता ही घटना घडली. ठाणे बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मोरे यांच्या पत्नीच्या हातातील बॅगेची चैन उघडून ६३ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. बसमध्ये बसल्यानंतर ही बाब निदर्शनास येताच मोरे दांम्पत्याने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस नाईक डंबाळे करीत आहेत.
तलवार घेवून फिरणा-या तरूणास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील मेरी भागात दहशत माजविण्यासाठी धारदार तलवार घेवून फिरणा-या तरूणास पोलिसांनी गजाआड केले. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश उर्फ बुट्या सुनिल गायकवाड (रा.वज्रेश्वरी झोपडपट्टी समोर पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या तलवारधारीचे नाव आहे. रविवारी (दि.३१) सर्वत्र थर्टी फस्ट साजरा केला जात असतांना दिंडोरीरोड भागात एक तरूण तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवित असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्या ताब्यातून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई वैभव परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक मालसाने करीत आहेत.
३४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूररोडवरील बेंडकुळे नगर भागात राहणा-या ३४ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदित्य प्रकाश ठाकुर असे मृत इसमाचे नाव आहे. ठाकुर यांनी गेल्या ११ डिसेंबर रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास कुटूंबियांनी त्यास तात्काळ श्रीगुरूजी हॉस्पिटल येथे दाखल केले असता रविवारी (दि.३१) उपचार सुरू असतांना डॉ.विक्रम सैनी यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सरनाईक करीत आहेत.