नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एव्हीएसएम, व्हीएसएम व्हाईस अॅडमिरल किरण देशमुख यांनी आज, १ जानेवारी रोजी भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.मुंबई विद्यापीठातील व्हीजेटीआय संस्थेचे माजी विद्यार्थी असलेले व्हाईस अॅडमिरल देशमुख हे ३१ मार्च १९८६ रोजी अभियंता अधिकारी म्हणून भारतीय नौदलात रुजू झाले.
त्यांनी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी मिळवली असून वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाची पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे. व्हाईस अॅडमिरल किरण देशमुख यांनी नौदल मुख्यालय, चाचणी संस्था, सामग्री संयोजन, एचक्यूईएनसी येथील नौदल गोदी आणि कमांड स्टाफ अशा अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी, कार्मिक तसेच सामग्री विभागात महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यासोबतच त्यांनी राजपूत, दिल्ली तसेच तेग श्रेणीतील आघाडीच्या जहाजांवर देखील काम केले आहे.
व्हाईस अॅडमिरल किरण देशमुख यांनी फ्लॅग ऑफिसर म्हणून नौदल मुख्यालयातील सामग्री विभागाचे सहाय्यक प्रमुख (गोदी आणि रेफिट्स), मुख्य कर्मचारी अधिकारी (तांत्रिक)/एचक्यूईएनसी, विशाखापट्टणम् येथील नौदल गोदी येथे अॅडमिरल अधीक्षक, विशाखापट्टणम् येथे नौदल प्रकल्पांचे महासंचालक तसेच नौदल मुख्यालयात युद्धनौका उत्पादन आणि संपादन नियंत्रक (सीडब्ल्यूपी आणि ए) म्हणून कार्य केलेले आहे.
व्हाईस अॅडमिरल देशमुख यांच्या सीडब्ल्यूपी आणि ए पदाच्याच कालावधीत देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका (आयएसी-आय) भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आणि या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेवर हलक्या वजनाच्या लढाऊ विमानांच्या समावेशाचा ऐतिहासिक क्षण अनुभवला. यासोबतच, त्यांच्या कार्यकाळात, अनेक आघाडीच्या युद्धनौका तसेच पाणबुड्या यांच्या बांधणीची सुरुवात, त्यांचे जलावतरण आणि या नौकांना नौदलाच्या सेवेत दाखल करण्याचे काम झाले. नौदलातील उल्लेखनीय सेवेसाठी व्हाईस अॅडमिरल किरण देशमुख यांना विशिष्ट सेवा पदक तसेच अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले आहे.