इंडिाया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले. सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावा असे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधानांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुजरातने २०२४ चे स्वागत एका उल्लेखनीय उपक्रमाने केले, तो म्हणजे – सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी १०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज जागतिक विक्रम प्रस्थापित करणे!
आपल्या सर्वांना माहीत आहेच की, १०८ क्रमांकाचे आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या स्थळांमध्ये मोढेरा सूर्य मंदीराचाही समावेश आहे. येथील कार्यक्रमात अनेक लोक सामील झाले होते. योग आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आमच्या वचनबद्धतेचा हा खरा पुरावा आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की मौलिक फायदे असलेल्या सूर्यनमस्काराला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.”