नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरणपूररोड भागात सरत्या वर्षाला निरोप देण्यसाठी चोरट्यांनी थेट थर्टी फस्टच्या पूर्वसंध्येला दारू दुकान फोडल्याची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी गल्यातील रोकडसह सुमारे ८८ हजाराच्या दारूच्या बाटल्यां लंपास केल्या.
या प्रकरणी शैलेंद्र शंकरराव कडवे (रा.अभोणकर लेन,रविवार पेठ) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडवे यांचा शरणपूररोडवर शरणपूर वाईन्स नावाचे दारू दुकान आहे.
शनिवारी रात्री निर्धारीत वेळेत कडवे दुकान वाढवून घरी गेले असता ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाच्या शटरचे लॉक तोडून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील रक्कम व दारूच्या विविध प्रकारच्या बाटल्या असा सुमारे ८७ हजार ६१० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.