मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड मध्ये टँकर ड्रायव्हर ट्रान्सपोर्टर आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात एकही टँकर भरून देत नाहीत. डीलरच्या मालकीचे सुद्धा टँकर अडवून ठेवलेले आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत नाशिक जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा होऊ शकतो अशी माहिती पेट्रोलपंप चालकांनी दिली आहे. मनमाडच्या ऑइल डेपोमधून नाशिक व जिल्हयात इंधन पुरवठा होत असल्यामुळे हा तुटवडा होऊ शकतो.
रस्ते आपघाताबाबत सरकारच्या जाचक व अन्यायकारक कायद्याच्या निषेधार्थ वाहन चालकांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपामध्ये मनमाडच्या पेट्रोलियम प्रकल्पातील इंधन वाहतूक करणाऱ्यां टँकर चालकांनीही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनमाड जवळच्या हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्पातून होणारा पुरवठा ठप्प झाला आहे.
या संपामुळे राज्यातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने अपघाताबाबत केलेल्या कायद्यामध्ये दहा वर्षांच्या शिक्षा आणि सात लाख दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याविरोधात चालकांमध्ये तीव्र भावना उमटल्या असून त्याविरोधात चालकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.