सुदर्शन सारडा नाशिक:
गेले वर्षभरात जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायविरोधी अभियान सुरू करून जिल्ह्यात चालणा-या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भरीव कामगिरी केली.
हेल्पलाईन खबर :-
सन २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांची माहिती जनतेतून मिळावी म्हणून खबर ही हेल्पलाइन सुरू केली. यासाठी ६२६२ २५ ६३६३ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला. जनतेने या हेल्पलाइनला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या भागात चालणा-या अवैध व्यवसायांची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचवली.
विशेष पथकांची निर्मिती :-
यासोबतच जिल्ह्यात वेगवेगळया भागात चालणा-या अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याकामी नाशिक ग्रामीण पोलीसांनी आठ विशेष पथकांची निर्मिती केली. सदर पथके जिल्ह्यातील नाशिक ग्रामीण, निफाड, कळवण, पेठ, मनमाड, मालेगाव शहर, मालेगाव कॅम्प व मालेगाव ग्रामीण अशा आठ उपविभागात सोडण्यात आली. सदर पथकांनी त्यांना नेमून दिलेल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती काढून तसेच हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या माहितीवर कारवाई करत जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कंबर कसली.
गुटखा निर्मूलनासाठी ग्रामीण पोलीसांची पाच सलग अभियाने :-
तरुणाईस गुटख्याच्या विळख्यापासून वाचविण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गुटख्याविरुद्ध सलग पाच महिने विशेष अभियान राबवून जिल्ह्यातील गुटख्याच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वोच्च पातळीवर प्रयत्न केले. सदर प्रकरणात कलम ३२८ भादवि खाली गुन्हे नोंद झाल्याने एकूण ९३९ गुटखा विक्रेत्यांना जेलमध्ये जावे लागले.
रणरागिनी पथके :-
अवैध व्यवसायांचा बीमोड करण्यासाठी नेमलेल्या पथकांसोबतच ग्रामीण व विशेषतः दुर्गम भागातील हातभट्टी व्यवसायांचे निर्मूलन करण्यासाठी महिला पोलीसांची तीन पथके कार्यरत केली होती. सदर महिला अंमलदारांनी जिल्ह्यातील दरी, डोंगर, नद्या, ओढे व नाले पिंजून काढत हातभट्टीची दारू तयार करणारे अड्डे उध्वस्त केले. महिला पोलीसांच्या सदर कामगिरीचे ग्रामीण भागातील महिलांनी विशेष कौतुक केले. काही भागात ग्रामीण भागातील महिलांनी रणरागिनी पथकातील महिला अंमलदारांचे हळदी-कुंकवाने औक्षण केले.दिनांक १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसाय विरोधात एकूण ६९३९ धाडी टाकून ९३८७ इसमांविरुद्ध कारवाया करत एकूण २९ कोटी १३ लाख ६९ हजार ७९७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर हस्तगत केलेल्या मुद्देमालात ३५ देशी बनावटीचे कट्टे, ६८ तलवारी, १७ कोयते व २३ चाकू हस्तगत करण्यात आले. वर्षभरात नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसाय विरोधात केलेली कामगिरी खालील प्रमाणे :-
बळीराजा हेल्पलाईन –
नाशिक जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा आहे. या भागातील द्राक्ष, डाळिंब, कांदा, टोमॅटो व भाजीपाला प्रसिद्ध असल्याने बाहेरील व्यापा-यांनी शेतक-यांचा माल खरेदी करून त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी पोलीस मुख्यालयाकडे प्राप्त होत होत्या. सदर बाब लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलीसांनी जिल्ह्यातील शेतक-यांना तकार करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच ६२६२ ७६ ६३६३ ही हेल्पलाईन सुरू केली. आजपर्यत सदर हेल्पलाईनवर एकूण १५७ शेतक-यांनी आपली ग-हाणी मांडली. यातील ६९ शेतक-यांना रुपये ५५ लाख ७१ हजार ११९ रुपये एवढी फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी मोलाची भूमिका बजावली.
प्रकरणांच्या कालबद्ध निर्गतीवर भर :-
नागरिकांनी मांडलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांची विशिष्ट कालमर्यादेत निर्गती करण्याच्या दृष्टीकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी प्रकरणांच्या कालबद्ध निर्गतीवर भर दिला. यामुळे शेतक-यांना जमीन मोजणीसाठी लागणारे बंदोबस्त, चारित्र पडताळणी, पासपोर्ट, अर्ज चौकशी, पेट्रोल पंप, शस्त्र परवाने इत्यादी प्रकरणे मुदतीत निकाली काढून सर्व सामान्य जनतेस दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
खून व दरोड्याचे गुन्ह्यांचा सखोल व शास्त्रोक्त तपास :-
जिल्ह्यातील खून व दरोड्याचे गुन्ह्यांना नाशिक ग्रामीण पोलीसांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. सन २०२३ मध्ये जिल्ह्यात एकूण ७६ खूनाचे गुन्हे नोंद झाले. यातील ७५ गुन्हे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश मिळाले आहे. याच आठवड्यात त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. सदर मयताची ओळख पटली असून स्थानिक गुन्हे शाखा व त्रंबकेश्वर पोलीस ठाणे सदर गुन्ह्याची उकल करण्याकामी एकवटले आहेत. त्याचप्रमाणे, यावर्षी जिल्ह्यात दरोड्याचे १६ गुन्हे घडले असून हे सर्व १६ गुन्हे उघडकीस आणण्यात नाशिक ग्रामीण पोलीसांना यश मिळाले आहे.