इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गंगापुर शिवारात प्लॉट मालकाच्या संमती शिवाय, परस्पर बनावट दस्तऐवज तयार करून विक्री करणा-या तीन जणांना न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुकदेव होणाजी दळवी, विनायक मधुकरराव गायकवाड व संदिप रमेश चौधरी ही शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात १२ वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या फसवणूकीची फिर्याद विश्वास मधुकर मालेगांवकर, (वय ५५ वर्षे, रा. साईमंगल अपार्टमेंट, २१६, महात्मानगर, नाशिक) यांनी २४ जानेवारी २०११ ला तक्रार दिली होती. त्यानंतर गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मालेगांवकर यांचे नावे असलेला गंगापुर शिवारातील प्लॉटचा आरोपीने बनावट पॅनकार्ड तयार करुन दुय्यम निबंधक सो, वर्ग-२ यांचे कार्यालयाची दिशाभुल करुन त्याचा परस्पर बनावट दस्तऐवज तयार करून विक्री केला.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक, बी. एन. काबुगडे, तत्कालीन नेमणूक गंगापुर पोलीस ठाणे, नाशिक शहर, यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून आरोपीविरुध्द जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रमांक ०४, नाशिक यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी सुकदेव होणाजी दळवी, विनायक मधुकरराव गायकवाड व संदिप रमेश चौधरी यांना सीआरपीसी कलम २४८ (२) अन्वये दोन वर्षाच्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा सरकारी अभियोक्ता म्हणून एस. आर. सपकाळे यांनी कामकाज बघितले.