ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी तब्बल अडीच लाखाच्या स्त्रीधनावर डल्ला मारत पोबारा केला यात पाच तोळे सोने चोरट्यांनी लुटून नेल्याने उपनगरातील रहिवशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहील्या घटनेत येथील मुंबई – आग्रा महामार्गावरील धामट नगर येथे रहाणाऱ्या सुरेखा बाजीराव घोटेकर या रा.८.१५ च्या दरम्यान एका कार्यक्रमातून घरी परतत असतांना घराचा दरवाजा उघडत होत्या. याचवेळी पंचवीस ते तीस वयोगटातील एका अनोळखी तरूणाने त्यांना मावशी असा आवाज दिला. यावेळी त्यांनी मागे वळून बघितले असता त्याच अनोळखी तरूणाने त्यांचे तोंड दाबत त्यांच्या गळ्यातील एक लाख किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पोत हिसकावुन घेत आपल्या सहका-या सोबत पोबारा केलाय
दुस-या घटनेत याच दिवशी रात्री ९ च्या दरम्यान महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागील बाजुस असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील महालक्ष्मी किराणा दुकानात लता कचेश्वर क्षीरसागर या दुकानात एकट्या होत्या. त्यावेळेस एक पंचवीस ते तीस वयोगटातील तरूणाने दुकानात येत पाच रूपयाचे नाणे देत एक चॅाकलेट व काडीपेटी क्षीरसागर यांच्याकडे मागितली त्यांनी चॅाकलेट व काडीपेटी काऊंटर ठेवताच या तरूणाने क्षीरसागर यांच्या गळ्यातील दोन लाख किमतीची तीन तोळ्याची सोन्याची पोत हिसकावुन घेत पोबारा केला. चोरट्यांनी तब्बल अडीच लाखाच्या सोन्यावर डल्ला मारल्याने उपनगरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरेखा घोटेकर व लता क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास ओझर पोलीस करीत आहेत.