नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते गुरुवार ४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून यात पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर, हिंदी अभिनेता गौरव चोपडा यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील महाकवी कालिदास सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर, हिंदी अभिनेता गौरव चोपडा यांचा समावेश आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीच्या सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे आज जाहीर करण्यात आली.
यामध्ये पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना सुविचार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिंदी अभिनेता गौरव चोपडा यांना सुविचार गौरव या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. समाजासाठी आयुष्यभर कार्य केलेले शेतकरी चळवळीचे नेते रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), अवयवदान चळवळीचे प्रणेते डॉ.भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय), डॉ. शेफाली भुजबळ (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक दत्ता पाटील (साहित्य), उद्योजक चंद्रशेखर सिंग (उद्योग), श्रीमती. संगिता बोरस्ते (कृषी), प्रा.नानासाहेब दाते (सहकार), मार्शल आर्ट महिला कुस्ती संघ खेळाडु कु.गौरी घाटोळ (क्रीडा) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे यांचे अध्यक्षतेखाली जेष्ठ साहित्यिक प्रा.विनोद गोरवाडकर व आय.एम.आर.टी.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत सुर्यवंशी हे सदस्य असलेल्या निवड समितीने सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तिंची निवड केली आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संयोजक आकाश पगार मोबा. ९४२१५६३५५५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.