इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक येथे नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांच्या निवासस्थानी शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते व आमदार संजय शिरसाट यांनी सदिच्छा भेट राजकीय वर्तूळात चांगलीच चर्चेची ठरली आहे. दोन दिवसापूर्वी ही भेट झाली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधान आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या विरुध्द दिनकर पाटील यांनी मोर्चा उघडला आहे. लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी त्यांनी सुरु केली आहे. भाजपकडून ते या जागेवर दावाही सांगत आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची बोलली जात आहे.
शुक्रवारी ही भेट झाली होती. योगायोगाने त्यांचे दिनकर अण्णा यांचे चिरंजीव अमोल पाटील यांचा त्याच दिवशी वाढदिवस होता. त्यावेळी संजय शिरसाट यांनी शुभेच्छाही दिल्या. आमदार संजय शिरसाट हे नाशिकला प्रसिद्ध उद्योगपती संजय आग्रवाल यांचे चिरंजीव विवाह सोहळ्यास आले होते. त्यावेळेस ते पाटील यांच्या निवासस्थानी गेले.
वरवर ही सदिच्छा भेट असली तरी नाशिकच्या राजकारणात याची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे. गोडसे यांना पर्याय शोधला जातो आहे अशी चर्चा आहे. त्यातच नाशिकची जागा भाजपला सोडून धुळे येथील जागा दादा भुसे यांना देण्याचेही बोलले जात आहे. यामुळे या सदिच्छा भेटीचे वेगवेगेळे अर्थ काढले जात आहे. या भेटीत काय राजकीय चर्चा झाली हे मात्र पुढे आले नाही.