इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरमध्ये हॅन्ड्लोज आणि जॅकेट बनवणा-या कंपनीला लागलेल्या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. वाळूज एमआयडीसीमध्ये शाईन इंटरप्राईजेस कंपनीत ही भीषण आग रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास लागली. हे सर्व कामगार बिहारमधील आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, कंपनीत कॉटनचे कापड मोठ्या प्रमाणात होते.
या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या गाड्या त्वरित दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणून कामगारांना बाहेर काढले. आगीत मृत्यू झालेल्या सहा कामगारांपैकी चार जणांची ओळख पटली आहे. भुल्ला शेख (६५), कौसर शेख (२६), इकबाल शेख (२६) आणि मगरूफ शेख (२५) अशी त्यांची नावे आहेत.
विशेष म्हणज रात्री आग लागली तेव्हा कंपनी बंद होती. पण, बिहारमधून कामानिमित्त आलेले पंधरा कामगार या कंपनीत झोपले होते. आग लागल्यानंतर काही कामगार बाहेर निघण्यात यशस्वी झाले. तर काही जण अडकले.