नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –करोना विषाणूच्या जे एन १ या सब वेरियंट मुळे घाबरण्याची गरज नाही परंतु सतर्कता पाळणे गरजेचे आहे. करोना लसीकरणाने रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ .भारती पवार यांनी आज नागपूर मध्ये दिली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्सची पाहणी केली आणि आढावा बैठकही घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आभा कार्डच्या उपयुक्तेते बाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीवेळी मार्गदर्शन केलं. रुग्णांची माहिती त्यांचा आरोग्य विषयक इतिहास याचं संगणकीकरण केलं जात असल्याने फाईल्सची लांबलचक प्रक्रिया हद्दपार करता येऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना सारख्या आपत्ती काळासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केले.
जनोपयोगी योजनांची माहिती एम्सने करून द्यावी आणि लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय फोन द्वारे समुपदेशन देऊ केले जाऊ शकते त्याचा देखील रुग्णांना लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आणि देशात मेडिकल कॉलेजची संख्या, गुणवत्तायुक्त शिक्षण आणि आरोग्य सेवा याबाबत केंद्रातर्फे देऊ करण्यात आलेल्या विविध उपाय योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
‘वसुधैव कुटुंबकम’ तत्वावर पुढील वाटचाल करीत उत्तम संशोधन आधारित मानवसेवा करायची आहे आणि आपल्या देशाला आरोग्य सेवेत आघाडीवर न्यायचे आहे असे आवाहन त्यांनी केले. एम्स नागपूरचे संचालक डॉ. हनुमंता राव, वैद्यकीय अधीक्षक श्रीगीरिवार यांनी एम्सच्या विविध उपक्रमांची माहिती पवार यांना यावेळी दिली.