जालना-– जालना-मुंबई वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे आजपासून सुरु झाली आहे. जालनेकरांसाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी काढले. जालना-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-ठाणे ते मुंबई असा जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा प्रवास असून या रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा मानस आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
अयोध्या रेल्वे स्थानकावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त जालना रेल्वे स्थानकाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात श्री. फडणवीस व श्री. दानवे यांनी सदर प्रतिपादन केले. मंचावर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालना येथून आज वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरू झाली आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार. वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सुविधांनीयुक्त रेल्वेप्रमाणे आहे. महाराष्ट्रात सध्या सहावी वंदे भारत ट्रेन जालन्यातून सुरू झाली आहे. याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त करतो. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सध्या 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी ही ट्रेन दोन वर्षात 250 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल. महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची रुपये एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरु आहेत. यावर्षी 13 हजार कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. अशा प्रकारे रेल्वेचा अभूतपूर्व विस्तार करण्यात येत आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील नागरिकांना राजधानी मुंबई येथे कामानिमित्ताने जाण्याची उत्तम सोय व्हावी या उद्देशाने जालना येथून वंदे भारत रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरपासून ते जालना दरम्यानचे इलेक्ट्रीकचे काम पूर्ण झाले असल्याने जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत रेल्वे सुरु करता आल्याने समाधान वाटत आहे. जालना-छत्रपती संभाजीनगर- नाशिक-ठाणे ते मुंबई असा या रेल्वेचा प्रवास असणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा मानस आहे. या रेल्वेची 530 प्रवासी क्षमता असून एकूण 8 डबे जोडले आहेत. भारतामध्ये वंदे भारत रेल्वेंची संख्या 34 झाली आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या रेल्वे दुहेरीकरणासाठी जवळपास 1 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मार्चपर्यंत काम सुरु होणार आहे आणि पुढील मार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. त्यालाही पैसे उपलब्ध करुन दिले आहेत.
जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभानंतर याच रेल्वेतून देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांनी प्रयाण केले.
जालना – मुंबई (सीएसएमटी) वंदे भारत एक्सप्रेसचा परिचय – जालना – मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वंदे भारत एक्सप्रेस ही मराठवाड्यातून चालवण्यात येणारी पहिली वंदे भारत ट्रेन सेवा आहे. ही ट्रेन मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) सारखी महत्त्वाची शहरे केवळ राज्याची राजधानी मुंबईशीच जोडणार नाही तर मनमाड, नाशिक, कल्याण, ठाणे आणि दादर या राज्यातील महत्त्वाच्या शहरांशीही जोडणार आहे. या स्वदेशी विकसित सेमी-हाय-स्पीड ट्रेन सेवेचा परिचय हा केवळ तांत्रिक मैलाचा दगड नाही तर आपल्या स्वदेशी प्रतिभेच्या पराक्रमाचा आणि आपल्या माननीय प्रधानमंत्री यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी ही एक मोठी झेप आहे. जागतिक दर्जाच्या मानकांशी जुळणाऱ्या अत्याधुनिक सुविधांनी भरलेली ही ट्रेन रेल्वे वापरकर्त्यांना सर्वात जलद, सोयीस्कर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय देते.
वंदे भारत रेल्वे सेवेची ठळक वैशिष्ट्ये – प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी ट्रेनला आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे एकूण आठ डबे आहेत. स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे असून सर्व श्रेणीमध्ये आरामदायी आसने आहेत. चेअर कारमध्ये रिक्लाइनिंग एर्गोनॉमिक सीट्स आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये 360 डिग्री रिव्हॉल्व्हिंग सीट्स आहेत. संपूर्ण रेल्वे वातानुकूलित आहे. रुंद आकाराच्या खिडक्यांमुळे प्रवासादरम्यान दोन्ही बाजूचे दृश्य दिसणार आहे. प्रत्येक आसनासाठी एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये मॅगझिन बॅग पुरवल्या आहेत. जीपीएस सक्षम प्रवासी माहिती सुविधा प्रवासा दरम्यान ट्रेनची थेट माहिती देते. सुधारित प्रवेशयोग्यतेसह प्रत्येक सीटसाठी मोबाइल चार्जिंग सॉकेट, हॉटकेस, बॉटल कुलर, डीप फ्रीझर आणि हॉट वॉटर बॉयलरच्या तरतुदीसह प्रत्येक कोचमध्ये मिनी पॅन्ट्री आहे. सर्व डब्यांमध्ये दिव्यांगजनांना अनुकूल सुविधा देण्यात आल्या आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत सुलभ प्रवेशासाठी सुधारित हॅमर बॉक्स कव्हरसह, आपत्कालीन उघडण्यायोग्य खिडक्या, प्रत्येक कोचमध्ये अग्निशामक यंत्रासह सुधारित एरोसोल आधारित आग शोधणे आणि दमन प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सर्व कोचवर इमर्जन्सी अलार्म पुश बटणे आणि टॉकबॅक युनिट्स आहे. व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधेसह ड्रायव्हर-गार्ड संवाद आणि कॅश हार्डन मेमरी सुविधा आहे. टच फ्री सुविधांसह आधुनिक बायो-व्हॅक्यूम टॉयलेटही आहेत.
एका दृष्टिक्षेपात रेल्वे सुविधा – ट्रेनने जालना ते मुंबई 436.36 किलोमीटरचे अंतर सहा तास 50 मिनिटांत कापले जाईल. रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस दोन्ही दिशेने ही रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमध्ये एकावेळी 530 प्रवासी क्षमता आहे, एकूण आठ डबे आहेत. जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस जालना येथून पहाटे 5.05 ला सुटेल. ती छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर येथे थांबेल. मुंबई येथे सकाळी 11.55 ला पोचेल. तर मुंबई येथून दुपारी 1.10 वाजता जालन्याकडे निघेल व जालन्यास रात्री 8.30 वाजता पोहोचेल.