मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सोयगाव परिसरात व्यापा-याची पैशाची बँग चोरण्यासाठी घरातील तीन लोकांवर प्राणघातक हल्ला करणा-या दोघांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, सटाणा नाका येथील कल्याणी कट्टा भागात एका अपार्टमेंट मध्ये पटेल नामक व्यापारी आपल्या दुकानातून घरी परत येत असतांना त्यांच्या जवळील पैशांची बॅग होती. त्याच्या पाळतीवर असलेल्या दोघांनी त्यांच्या घरात घुसून शस्त्र हल्ला चढवत घरातील तीन लोकांना जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी या हल्लेखोरांना चोप दिला.
या हल्लेखोरांकडे बंदूक व तिक्ष्ण हत्यार पाहून घरातील महिलांनी आरडा-ओरड केली असता घरातील महिलेवर व लहान मुलांवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याने त्यात ते जखमी झाले. अचानक झालेल्या आरडा-ओरडीने परिसरातील नागरीकांनी पळून जात असलेल्या दोघांना पकडून बेदम मारहाण केली.
घराकडे जात असतांना घटनेची माहिती समजताच पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने छावणी पोलिसांशी संपर्क साधत हल्लोखोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी मोठ्या संख्येने जमाव छावणी पोलिसस्थानकाजवळ जमला होता. रात्री उशिरा छावणी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पकडण्यात आलेले दोघे जण हे धुळे येथील असल्याचे समजते.