पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राष्ट्रवादीत फुट पडल्यामुळे बारामती मतदार संघ सुप्रिया सुळे साठी सोपा नाही. त्यामुळे आगामी निवडणूक पवार विरुध्द पवार ही पहिल्यांदा असणार आहे. त्यातच अजित पवार यांनी बारामती येथे उमेदवार देण्याचे घोषीत केल्यामुळे आता विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळे या सुध्दा कामाला लागल्या आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीपर्यंत बारामतीतच मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी पुढील १० महिन्यांपर्यंत मुंबईच्या घराचे तोंड न पाहण्याचा निर्धार केला आहे. आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक पार पडेपर्यंत मी बारामतीमध्येच मुक्काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी माझ्या कुटुंबीयांनाही त्याची कल्पना दिली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या आता माझी गाडी मुंबईला जाणार नाही. मी माझा नवरा व मुलांनाही त्याची कल्पना दिली आहे. यापुढे माझ्या नवऱ्याला व मुलांना मला भेटायचे असेल तर पुणे, बारामती किंवा इंदापुरात यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच आपण १०-१५ वर्षांपासून बारामती लोकसभा मतदार संघाकडे लक्ष्य दिले नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता सुप्रिया सुळेच मैदानात उतरल्या असून त्यांनी बारामतीतच मुक्काम करण्याचा निर्णय घेऊन मतदार संघाकडे अधिक लक्ष देण्याचे निश्चित केले आहे.