नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – आग्रा महामार्गावर शुक्रवारी दुपारी जुन्या कसारा घाटात कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. मुंबईहून नाशिकच्या दिशेने ही कार येत असताना जुना कसारा घाटात घाट चढून आल्यावर टोप बाबडी जवळ या कारने पेट घेतला. महिंद्रा कंपनीची XUV कार ही होती. या कारचा नंबर एमएच ०४ एचएफ ३६४१ हा आहे.
आग कशाने लागली याची माहिती मिळू शकली नसली तरी शॅार्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करुन गाडीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याने जिवितहानी टळली. पण, कार जळून खाक झाली.
या घटनेमुळे जुना कसारा घाटातील वाहतुक एक तासापासून बंद करुन नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली. या घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलिस केंद्र घोटी, इगतपुरी नगरपरिषदेचे अग्निशमन दल, टोल नाक्याचे अग्निशमन दल, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ही आग आटोक्यात आली. यानंतर या घाटातून वाहतुक सुरळीत सुरु झाली.